देशातील अब्जाधीश आणि सर्वांत श्रीमंत ‘सेल्फमेड’ महिला NYKAA च्या संस्थापिका – फाल्गुनी नायर

self-made-woman- nykaa-falguni-nair

फाल्गूनी नायर यांनी 2012 मध्ये नायकाची स्थापना केली. पुरुष आणि महिलांसाठी ऑनलाईन सौदर्यंप्रसाधाने पुरवण्याच्या उद्देशाने ही कंपनी स्थापन करण्यात आली. तोपर्यंत ग्राहकांना सौदर्यंप्रसाधने विकत घेण्यासाठी स्थानिक दुकानदारांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र, नायका कंपनीने ही सर्व समीकरणे बदलून टाकली. स्मार्टफोनवरील एका क्लिकवर ग्राहकांना हवी असलेली दर्जेदार सौदर्यंप्रसाधाने आणि इतर उत्पादने उपलब्ध होऊ लागली. अगदी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्यांची उत्पादनेही नायकाच्या संकेतस्थळावर सहजपणे मिळू लागली त्यामुळे नायका हा ब्रँड अल्पावधीत लोकप्रिय झाला. सौदर्यंप्रसाधने आणि लिपस्टीकच्या असंख्य शेडसमुळे नायका ही आघाडीची ऑनलाईन रिटेलर कंपनी म्हणून नावारुपाला आली.

19 फेब्रुवारी 1963 रोजी मुंबई, महाराष्ट्रातील गुजराती कुटुंबात जन्मलेल्या फाल्गुनी नायरचे वडील व्यापारी होते. त्यांची आईही व्यवसायात मदत करायची. पण फाल्गुनीला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर फाल्गुनी नायर यांनी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद मधून पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतले.

self-made-woman- nykaa-falguni-nair

मुंबईत जन्मलेल्या फाल्गुनी यांच्या वडिलांचा बेअरिंगचा व्यवसाय होता. व्यापार, गुंतवणूक या क्षेत्रांशी त्यांचा लहानपणापासून परिचय होता. अहमदाबादेतील ‘आयआयएम’मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी व्यवस्थापन सल्लागार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ‘कोटक महिंद्रा’ मध्ये १९ वर्षे सेवा केली आणि ‘कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट बँके’च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहिले. दरम्यान, त्यांची मुले शिक्षणासाठी परदेशी गेली. पन्नाशीत मिळविलेल्या या यशावर समाधान न मानता त्यांनी नवी ‘इनिंग’ सुरू केली आणि आयुष्यभर पाहिलेले उद्योजक बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीयांचे उत्पन्न आणि क्रयशक्ती वाढली; तसेच कमावत्या महिलांची संख्याही वाढली. जीवनमान उंचावण्यासाठी सौंदर्य प्रसाधने आणि फॅशनसाठी खर्च करण्याकडे या ‘मिलेनियल्स’ चा असलेला कल नायर यांनी ओळखला आणि ‘नायका’ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली. नायका हा संस्कृत शब्दापासून तयार झालेला शब्द असून, त्याचा अर्थ नायिका असा आहे. प्रारंभी साठ ऑर्डरवर सुरू केलेला व्यवसाय आता या क्षेत्रातील साम्राज्य ठरला आहे. आतापर्यंत त्यांचे ऍप साडेपाच कोटी जणांनी डाउनलोड केले आहे. नेक नामवंत आंतरराष्ट्रीय ब्रँड्स, ज्यांच्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं, असे ब्रँड्सही उपलब्ध केले. त्यामुळे बॉलिवूड कलाकार (Bollywood Artist) आणि सेलिब्रिटीजही नायकाचे ग्राहक बनले. बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींच्या डेमो व्हिडिओमुळे ऑनलाईन विक्रीला चांगलीच चालना मिळाली. ४० शहरांमध्ये त्यांची ८० स्टोअर आहेत.
self-made-woman- nykaa-falguni-nair

मेबेलाईन, लॅक्मे, लॉरियलसह मॅक (MAC), हुडा ब्युटी आणि एस्टी लॉडरसारख्या लक्झरी ब्रँडसह 300 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची उत्पादनं इथं उपलब्ध असतात. वधूच्या मेक-अपसाठी आवश्यक वस्तू, लिपस्टिक, फाउंडेशन, नेल कलर अशा असंख्य गोष्टी उपलब्ध करणारी नायका कंपनी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने देशातली टॉप ऑनलाईन ब्युटी रिटेलर बनली आहे. आता नायका कंपनीने स्वतःची कॉस्मेटिक, स्किनकेअर, हेअरकेअर आणि इंटिमेट वेअर लाइनदेखील बाजारात आणली आहे.

कंपनीनं दाखल केलेल्या आयपीओला (IPO) ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 89 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर (Falguni Nayar) यांची संपत्ती 6.5 बिलियन डॉलर्सवर गेली आहे. त्यामुळे 58 वर्षीय नायर आता भारतातल्या सर्वांत श्रीमंत महिला आहेतच; पण इंडिया ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समधल्या (India Bloomberg Index) जगातल्या सहा महिला अब्जाधीशांमध्ये (World’s Billionare Women) त्यांचा समावेश झाला आहे. नायर यांच्याकडे कंपनीचे जवळपास निम्मे शेअर्स आहेत.

मुंबई: Nykaa चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO फाल्गुनी नायर (C-L), तिची मुलगी अद्वैत (C-R), बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि इतरांसह नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे कंपनीच्या IPO सूचीकरण समारंभाला उपस्थित होते


एका महिलेच्या नेतृत्वाखालच्या या युनिकॉर्न कंपनीनं 10 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात पदार्पण केलं. आयपीओला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कंपनीच्या संपत्तीत भरघोस वाढ झाली आहे. 2012 मध्ये सुरुवात करून अल्पवधीतच यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करणाऱ्या या कंपनीच्या मुकुटात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

नायका कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) 2001 रुपयांवर उघडला, इश्यू किमतीच्या तुलनेत त्याची किंमत 77.87 टक्क्यांनी वाढली, तर राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) या शेअरच्या किमतीत तब्बल 79.83 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन तो 2018 वर नोंदला गेला. कंपनीने 28 ऑक्टोबर ते नोव्हेंबर 1 या कालावधीत 1085-1125 रुपये किंमत पट्ट्यात हा शेअर आयपीओद्वारे विक्रीसाठी खुला केला होता. या आयपीओद्वारे 5352 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना होती.

self-made-woman- nykaa-falguni-nair

नायकाला प्रचंड यश मिळालं असलं, तरीही कंपनीला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असं फाल्गुनी नायर म्हणतात. त्याकरिता कंपनीने फॅशन उद्योगात काम सुरू केलं असून, नायर यांची उच्चशिक्षित मुलगी आणि मुलगा त्याचं व्यवस्थापन सांभाळत आहेत. ‘वयाच्या 50 व्या वर्षी मी कोणताही अनुभव नसताना नायका कंपनीची सुरुवात केली. आज नायका यशस्वी ठरली आहे. नायकाचा हा प्रवास तुमच्यापैकी अनेकांना प्रेरणा देईल,’ अशी प्रतिक्रिया फाल्गुनी नायर यांनी व्यक्त केली आहे. गृहिणी म्हणून कुटुंबाकडे लक्ष देतानाही उत्तुंग ध्येयाला गवसणी घालणे शक्य आहे, हाच त्यांच्या यशोगाथेचा संदेश आहे.

कंपनीची मालकी दोन कुटुंबाच्या नावे असणारे ट्रस्ट आणि सात इतर प्रमोटर्सकडे आहे. यामधील प्रमोटर्समध्ये फाल्गुनी यांचा मुलगा आणि मुलीचाही समावेश आहे.

फाल्गुनी नायर यांनी आपल्या मेहनत आणि नव्या विचाराच्या जोरावर एक नवी यशोगाथा लिहिली आहे. नायका हा ब्रँड आता भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फॅशन प्लॅटफॉर्म पैकी एक मानला जातो. त्यांच्या याच यशामुळे भारतीय महिला अगदी कोणत्या क्षेत्रात मागे नाही हे सिद्ध होते. स्वतःला कधीही कमी समजू नये. प्रत्येक महिला ही तिच्या स्वतःच्या आयुष्याची नायिका आहे, असा संदेश फाल्गुनी नायर यांनी देशभरातील सर्व महिलांना दिलेला आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी कोणताही अनुभव नसताना फाल्गुनी नायर यांनी नायकाचा प्रवास सुरू केला हे भारतातील प्रत्येक महिलेसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे

Post a Comment (0)
Previous Post Next Post