इतक्या महागाईच्या जमान्यात एवढ्या स्वस्तात नाश्ता मिळतो असं सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार का. पण तमिळनाडूमधल्या कोईम्बतूर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या ८५ वर्षाच्या एम कमलाथल आजी फक्त १ रुपयात स्वादिष्ट इडली विकतात आणि आजी ‘इडली अम्मा’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
सध्या महागाई एवढी वाढली आहे की १ रुपयांत चॉकलेट, गोळ्या या व्यतिरिक्त काहीही मिळत नाही, हे आपण जाणतो. म्हणूनच तर १ रुपयांत इडली खाऊ घालणारी ही इडली अम्मा सगळ्यांपेक्षा वेगळी ठरते. एक- दोन नाही तर तब्बल ३७ वर्षांपासून इडली अम्मा हा उपक्रम राबवते आहे. वडिवेलम्पलयम येथेच तिचं एक झोपडीवजा हॉटेल आहे. तेच तिचं घर आणि तेच तिचं हॉटेल. त्या भागातल्या गरिबांसाठी ती जणू काही अन्नपुर्णाच आहे. कारण त्या प्रांतातील सगळेच गोरगरीब, मजूर, गरजवंत प्रवासी अशा सगळ्यांनाच ती १ रुपयांत इडली खाऊ घालते. कमी पैसा असेल तरी तिच्याकडे जाऊन आपलं पोट भरेल, हा विश्वास तिथल्या हजारो लोकांच्या मनात तिने निर्माण केला आहे.
एम कमलाथल आजी रोज सकाळी साडे पाच ला उठते आणि चटणी व संभार बनवते. मग सकाळी सहा ला चूल पेटवून इडल्या करायला सुरवात करते. दुपारी बारा वाजेपर्यंत इडल्या विकते. एम कमलाथल आजी अजूनही सगळ्या गोष्टी आपल्या हातांनीच वाटण घटन करते.
योग्य आहाराची सवयच उत्तम आरोग्याचं रहस्य आहे असं आजी नेहमी सांगतात. आजी सांगतात कि नाचणी ज्वारी आणि कड धान्य त्या जास्त खायचे त्यामुळेच त्या तंदुरुस्त आहे.