अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारणारी, झाडांची गोष्ट सांगणारी तुलसी गौड़ा आजी ची गोष्ट जगायचं बळ देते. पद्मश्री पुरस्कार देशातला चौथा सर्वोच्च नागरी सन्मान. तुलसी गौड़ा आजी चं नाव पुकारलं जातं. तर त्या आपल्या नेहमीच्याच पारंपरिक वेशभूषेत अनवाणी पायाने पंतप्रधानांपासून सर्वांना अभिवादन करत राष्ट्रपतींपर्यंत पोहोचतात... हे चित्र अख्ख्या देशाने पाहिलं. वृत्त वाहिन्यांनी पुन्हा-पुन्हा दाखवलं. अनवाणी पायाने रेड कार्पेटवर चालत जाणारी गावखेड्यातली, पारंपरिक कपड्यातली साधी आजी, इतकंच याचं महत्त्व नव्हतं. त्यांच्या देहबोलीतदेखील एक अदब होती. तुलसी गौडा आजी त्यांचं नाव. (tulsi gowda) समाजाला दिलेलं पर्यावरणाशी संबंधित योगदान या गटात त्यांना पुरस्कार मिळाला होता. अशा व्यक्तीला पुरस्कार मिळणं हा एका अर्थी पुरस्काराचाच सन्मान असतो.
तुलसी गौडा आजी यांचा जन्म १९४४ मध्ये कर्नाटकातील होन्नली या गावातील हक्काली जमातीत झाला. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर तुलसी ने रोजंदारीवर काम करायला सुरुवात केली. ती आईसोबत स्थानिक नर्सरी मध्ये काम करायची. तुलसी आजी ने ३५ वर्षे आपल्या आईसोबत नर्सरी मध्ये रोजंदारी कामगार म्हणून काम केले. वयाच्या अगदी दहाव्या, बाराव्या वर्षापासूनच त्यांचा झाडाफुलांशी जवळून संबंध आला. या दरम्यान, त्यांचे कोणतेही औपचारिक शिक्षण झाले नाही, परंतु झाडे आणि वनस्पतींमधील रोपवाटिकेत त्यांना निसर्ग समजून घेण्याची अतिशय महत्त्वाची संधी मिळाली.
वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. आपल्या आयुष्यातील दुःख आणि एकटेपणा दूर करण्यासाठी तुलसी आजी ने झाडे-झाडांची काळजी घेण्यास सुरुवात केली. तिची वनस्पती संरक्षणाची आवड वाढली आणि ती एक स्वयंसेवक म्हणून राज्याच्या वनीकरण योजनेत सहभागी झाली. २००६ मध्ये त्यांना वनविभागात वृक्ष लागवडीची नोकरी मिळाली आणि चौदा वर्षांच्या कार्यकाळानंतर त्या निवृत्त झाल्या. यावेळी त्यांनी असंख्य झाडे लावली आणि जैविक विविधतेच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रत्येक झाड हे एक मूल असतं. त्याचे वाढीचे टप्पे, पाण्याची, सूर्यप्रकाशाची, खताची गरज वेगळी असते. प्रत्येक झाडाचा वाढण्या-फुलण्याचा एक विशिष्ट ऋतू असतो. जंगलातल्या ठराविक झाडांचं बी कधी लागतं, ते किती दिवस झाडावर पक्व होऊ द्यावं, कधी ते काढावं, कसं जतन करावं, कधी ते मातीत पुन्हा पेरावं, ह्याचं शास्त्र असतं. तुलसी गौडा त्यांच्या उपजत निसर्ग ज्ञानातून आणि अनुभवातून हे सर्व शिकत गेल्या. हजारो झाडं त्यांनी मातीत रुजवली, जपली.
या अनुभवामुळे आणि समजुतीमुळे तुलसी आजी यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोठे योगदान दिले. तुलसी आजी जंगलातील कोणत्याही एका प्रकारच्या झाडांमध्ये त्यांच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असलेले मदर ट्री ओळखण्यात प्रभुत्व मिळवले आहे. याशिवाय बियाण्यांच्या गुणवत्तेचाही त्यांना खूप अनुभव आहे. ७८ वर्षांच्या तुलसी आजी ने आयुष्यात किती झाडे लावली हे सांगता येणार नाही. तुलसी आजी अंदाजे ४० हजार हुन अधिक झाडे लावली आहेत. आपले संपूर्ण आयुष्य झाडांसाठी वाहून घेतलेल्या तुलसी आजी ला झाडे आणि वनस्पतींचे अद्भुत ज्ञान आहे. त्यामुळे तुलसी आजी ला जंगलाचा इनसाइक्लोपीडिया म्हटले जाते.हजारो झाडांची नुसती लागवडच नाही, तर जतन, संवर्धन करत असताना लहान मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी, यासाठीदेखील तुलसी आजी अविरत कष्ट घेत असतात.
घरची गरिबी, शिक्षण नसणं, साधन सामग्रीचा अभाव अशी आयुष्यात रडत बसायची हजारो कारणं एकीकडे आणि हे सगळं असूनही आपण काही भरीव योगदान निसर्गाप्रति देऊ शकतो, असा आत्मविश्वास दुसरीकडे. त्यातूनच तुलसी गौडा आजी घडल्या. सर्व अभावातदेखील आपल्याकडे जे काही आहे, तेच वाढवत नेलं, अविरत कष्ट घेतले तर प्रत्येक स्त्रीला तुलसी आजीकडून प्रेरणा मिळू शकते. त्या केवळ निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रातली प्रेरणा नाहीत, तर खंबीरपणे स्वतःचं आयुष्य उभं करण्याचीदेखील ऊर्जा आहेत